पारंपरिक वेशभूषा, आदिवासी नृत्य अन् ढोल-ताशांच्या गजराने शहर दुमदुमले; मिरवणुकीत समाजबांधवांचा मोठा सहभाग
धरणगाव प्रतिनिधी : जागतिक आदिवासी दिनानिमित्त धरणगाव शहरात रविवारी आदिवासी समाजबांधवांच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, आदिवासी नृत्य आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महिला, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक तसेच बालकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आदिवासी संस्कृती आणि परंपरेचा जागर केला.
या मिरवणुकीत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थिती लावत आदिवासी समाजबांधवांच्या आनंदात सहभाग घेतला. यावेळी ढोल-ताशांच्या तालावर गुलाबराव पाटील यांनी उत्स्फूर्तपणे ठेका धरला. पालकमंत्र्यांनी मिरवणुकीत सहभागी होत ढोल-ताशांच्या तालावर आनंद व्यक्त केल्याने उपस्थितांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला.
पारंपरिक वेशभूषेत सांस्कृतिक वारशाचे दर्शन
मिरवणुकीत आदिवासी समाजाच्या पारंपरिक कला, संस्कृती, वेशभूषा आणि लोकपरंपरांचे आकर्षक दर्शन घडले. विविध सांस्कृतिक पथकांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ढोल, ताशे आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादाने धरणगाव शहर अक्षरशः दुमदुमून गेले.
महिला, युवक-युवती आणि लहान मुलांनी पारंपरिक पोशाख परिधान करून मिरवणुकीत उत्साहाने सहभाग घेतला. मिरवणुकीच्या मार्गावर नागरिकांनीही मोठी गर्दी करत आदिवासी समाजाच्या विविध सांस्कृतिक सादरीकरणांचा आनंद घेतला.
संस्कृती, परंपरा आणि हक्कांचा जागर
जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आयोजित या मिरवणुकीतून आदिवासी समाजाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा आणि तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संदेश देण्यात आला. त्याचबरोबर आदिवासी समाजाचे हक्क, विविध मागण्या आणि विकासाशी संबंधित प्रश्नांबाबतही जनजागृती करण्यात आली.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त धरणगाव शहरात पार पडलेल्या या भव्य मिरवणुकीमुळे एकता, बंधुभाव आणि सांस्कृतिक अभिमानाचे दर्शन घडले. ढोल-ताशांच्या तालावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धरलेला ठेका हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले.
Post a Comment