Top News

जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्रात प्रथमच ३२ शहिदांचे भव्य स्मारक व अभ्यासिका उभारणार: पालकमंत्री गुलाबराव पाटील

प्रत्येक शहीद स्मारकाजवळ सैनिक भरतीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी लायब्ररी उभारणार; ग्रामपंचायत व नगरपालिकेकडून देखभालीची व्यवस्था करण्याचा संकल्प

जळगाव : नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आणि जिल्हा नियोजन समितीच्या सहकार्याने जिल्ह्यातील शहीद झालेल्या ३२ जवानांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणाऱ्या शहीद स्मारकाचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला.

यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्रात अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच जळगाव जिल्ह्यात राबविला जात आहे. ज्या-ज्या गावांमध्ये जळगाव जिल्ह्यातील जवान शहीद झाले आहेत, त्या गावांमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून शहीद स्मारके उभारण्यात येणार आहेत.

ही स्मारके केवळ स्मरणस्थळे न राहता देशसेवेची प्रेरणा देणारी केंद्रे बनावीत, यासाठी प्रत्येक स्मारकाजवळ सैनिक भरतीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी अभ्यासिका किंवा लायब्ररी उभारण्याची संकल्पना असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्मारकांची देखभाल व दुरुस्तीसाठी संबंधित ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेमार्फत कर्मचारी नियुक्त करण्याचीही संकल्पना असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

“देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांचे स्मरण पुढील पिढ्यांनाही कायम राहिले पाहिजे. गावात प्रवेश करताना प्रत्येकाची नजर या भव्य स्मारकाकडे जाईल आणि शहीद जवानांच्या त्यागाची आठवण प्रत्येकाला होईल,” अशी भावना गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

देशाच्या रक्षणासाठी आपल्या मुलांना युद्धभूमीवर पाठविणाऱ्या माता-पित्यांच्या त्यागाचा उल्लेख करताना पालकमंत्री भावुक झाले. आई स्वतः उपाशी राहून आपल्या मुलांना घास भरवते; मात्र देशाच्या रक्षणासाठी आई-वडील आपल्या पोटच्या गोळ्याला सीमेवर पाठवतात. या त्यागाला तोड नाही, असे सांगताना त्यांनी शहीद कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

पालकमंत्र्यांच्या या भावनिक मार्गदर्शनामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित शहीद जवानांचे नातेवाईक आणि ग्रामस्थही भावुक झाले. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

यावेळी कॅबिनेट मंत्री संजय सावकारे, आमदार राजूमामा भोळे, आमदार किशोरआप्पा पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जळगावचे आयुक्त, जिल्हा पोलीस अधिकारी श्रीकांत धीवरे, शंभू पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही शहीद जवानांच्या त्यागाला अभिवादन करत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यातील ३२ शहीद जवानांचे नातेवाईक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच जळगाव जिल्हा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पी. एम. पाटील सर, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंद भाऊ नन्नवरे, जळगाव तालुका शिवसेनाप्रमुख शिवराज पाटील, धरणगाव तालुका प्रमुख देविदास पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख जितेंद्र पाटील, दूध संघाचे संचालक रमेश पाटील, सभापती जना आप्पा सोनवणे, संदीप मेजर, अतुल घुगे, अभिजीत भाऊ पाटील, विश्वनाथ पाटील, नवल पाटील यांच्यासह कर्मचारी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले.

शहीदांच्या त्यागाला कायमस्वरूपी सलाम

जळगाव जिल्ह्यातील ३२ शहीद जवानांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणारी स्मारके ही केवळ वास्तू न राहता देशभक्ती, त्याग आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारी स्मृतिस्थळे ठरावीत, असा संदेश या कृतज्ञता सोहळ्यातून देण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज