Top News

पुनर्जन्म झालेल्या बहिणीला मंत्री संजय राठोड यांच्याकडून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा


संकटावर मात करून बहिणीचे नवजीवन; भावाने फोन करून घेतली आस्थेने विचारपूस

◾प्रतिनिधी - सुरज पवार 
वसई : रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त मंत्री संजय राठोड यांनी आपल्या बहिणी श्रीमती मालिनी चं. पवार यांना फोन करून रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. काही दिवसांपूर्वी महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून कार्यरत असताना मालिनी पवार यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र, महाविद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक, प्राध्यापक व कर्मचारीवृंद यांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केल्याने त्यांच्यावर वेळेत अँजिओप्लास्टी करण्यात आली. उपचारानंतर त्या पुन्हा आपल्या नियमित जीवनात परतल्या आहेत.

कोरोना महामारीच्या काळातील प्रतिकूल परिस्थितीत मंत्री संजय राठोड यांनी जनसंपर्क व जनआशीर्वाद दौऱ्याला सुरुवात केली होती. त्यावेळी बहिणी मालिनी पवार यांनी भावाला ओवाळताना, “माझ्या भावावर आलेली सर्व संकटे दूर होऊन त्यांना पुन्हा राजकीय सत्तेत सहभागी होता यावे आणि समाजासह गरजूंची सेवा करण्याची संधी मिळावी,” अशी प्रार्थना केली होती. कालांतराने त्यांची ही प्रार्थना पूर्ण झाली आणि संजय राठोड पुन्हा मंत्री झाले, असा भावनिक उल्लेख प्रा. सी. के. पवार यांनी केला आहे.

बहिणीच्या आजारपणाची माहिती मिळताच मंत्री संजय राठोड यांनी फोनवरून तिची आस्थेने विचारपूस केली. तसेच आपल्या सौभाग्यवतींसह वसई येथील घरी प्रत्यक्ष भेट देण्यासाठी येण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने पुन्हा फोन करून बहिणीला शुभेच्छा देत भावाने आपली प्रेमाची आणि आपुलकीची नाळ जपली.

श्रीमती मालिनी चं. पवार या केवळ शिक्षण क्षेत्रात उपप्राचार्य म्हणून कार्यरत नसून कला क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. ‘संत सेवालाल’ या पहिल्या बंजारा चित्रपटात त्यांनी जगदंबा देवीची भूमिका साकारली आहे. तसेच ‘नवलेरी वेतडू’ या पहिल्या बंजारा नाटकात कमलीची भूमिका त्यांनी साकारली असून, ‘बंजारा धमाका’ या पहिल्या बंजारा ऑर्केस्ट्रामध्ये गायिका म्हणूनही त्यांनी योगदान दिले आहे.

आई जगदंबा, श्री संत सेवालाल महाराज, मुंगसाजी महाराज, तपस्वी रामराव बापू आणि सर्वांच्या आशीर्वादाने मालिनी पवार आज पुन्हा नवजीवनाची वाटचाल करीत आहेत. या नव्या आयुष्याला पुनर्जन्माची अनुभूती असल्याचे सांगत, दोघा बहीण-भावाचे भविष्य सदैव उज्ज्वल राहावे, अशी प्रार्थना प्रा. सी. के. पवार, चित्रपट निर्माता-दिग्दर्शक व समाजसेवक यांनी व्यक्त केली.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावाबहिणीच्या नात्यातील प्रेम, काळजी आणि जिव्हाळ्याचे दर्शन घडविणारा हा प्रसंग भावनिक ठरला.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज