Top News

गणेशोत्सव 'डीजे'मुक्त आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करा ! - हिंदु जनजागृती समितीचे आवाहन


     सार्वजनिक गणेशोत्सवाचे पावित्र्य राखण्यासाठी हा उत्सव पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि 'डीजे'मुक्त (DJ) साजरा करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले आहे.

     याविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले की, "गणेशोत्सव हा मूळचा सात्विक, पवित्र आणि आनंददायी असा उत्सव आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या मंगलमय उत्सवाला गालबोट लागल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः 'डीजे'च्या माध्यमातून लावली जाणारी अश्लील गाणी, त्यावर होणारी बीभत्स नृत्ये आणि कर्णकर्कश आवाज यांसारख्या विकृती उत्सवात शिरल्या आहेत. या सर्व प्रकारांमुळे गणेशभक्त आणि सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा व शांततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

     लोकमान्य टिळकांनी समाज प्रबोधन, लोकजागृती आणि हिंदु संघटन या उदात्त हेतूंनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. मात्र, सध्या पाश्चिमात्यांच्या अंधानुकरणामुळे हा मूळ उद्देश कुठेतरी हरवत चालला असून उत्सवाचे स्वरूप विकृत होत आहे. हिंदु जनजागृती समितीने गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवातील या 'डीजे' संस्कृतीला आणि अन्य अनिष्ट प्रथांना सातत्याने कडाडून विरोध दर्शवला आहे. यावर्षीही अशा अपप्रवृत्तींना आळा बसावा, अशी आमची ठाम मागणी आहे.

     सद्यस्थितीत एक सकारात्मक बाब म्हणजे, अनेक गणेशोत्सव मंडळे 'डीजे'मुक्त उत्सव साजरा करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येत आहेत. सोलापूरसारख्या शहरात 'सोलापूर पॅटर्न' राबवून एक चांगला आदर्श निर्माण करण्यात आला आहे. भाविकांना खऱ्या अर्थाने सात्विक आनंद मिळवून देण्यासाठी, लोकप्रबोधन करण्यासाठी तसेच हिंदु संस्कृती आणि परंपरांचे जतन करण्यासाठी उत्सवामध्ये 'डीजे'ची अजिबात आवश्यकता नाही. पारंपारिक वाद्यांच्या गजरात आणि आपल्या वैभवशाली संस्कृतीनुसार गणेशोत्सव साजरा केल्यास त्याला कोणाचाही विरोध असणार नाही."

     त्यामुळे सर्व गणेशोत्सव मंडळे, गणेशभक्त आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पुढे यावे आणि आपला गणेशोत्सव पारंपरिक वाद्यांच्या साथीने, अत्यंत आनंदाने व परंपरेनुसार 'डीजे'मुक्त साजरा करावा, असे आवाहन श्री. घनवट यांनी या वेळी केले.


 

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज