Top News

वृक्षसंवर्धनासाठी विद्यार्थीनींनी पुढाकार घ्यावा : सुरेश राठोड

 

वृक्षसंवर्धनासाठी विद्यार्थीनींनी पुढाकार घ्यावा : सुरेश राठोड


उमरी प्रतिनिधी श्री सुरज पवार : कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृह, फुलसिंग नगर, उमरी येथे महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती महोत्सवानिमित्त रोपदान, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थीनींना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत प्रत्येकाने वृक्षलागवडीसोबत वृक्ष संगोपनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन सुरेश राठोड यांनी केले.

नवज्योत मानव विकास मंडळ व सेवा दळ सेवा संघटना भारत यांच्या वतीने गेल्या 18 वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या ‘वसंत वन अभियान’ अंतर्गत 1 जुलै ते 18 ऑगस्ट या कालावधीत रोपदान व वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती केली जात आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून उमरी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना सुरेश राठोड म्हणाले, “आज आपण केवळ झाडे लावण्यासाठी एकत्र आलो नाही, तर उद्याच्या पिढीचे भविष्य सुरक्षित करण्याचा संकल्प करण्यासाठी एकत्र आलो आहोत.” वृक्षारोपण करण्याइतकेच लावलेल्या रोपांचे संगोपन करणे महत्त्वाचे आहे. “एक झाड लावणे हे एका दिवसाचे काम आहे; मात्र त्या झाडाचे संगोपन करणे ही आयुष्यभराची जबाबदारी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.


रोपाला नियमित पाणी देणे, त्याचे संरक्षण करणे, परिसर स्वच्छ ठेवणे तसेच आवश्यकतेनुसार रोपाला आधार देणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे राठोड यांनी सांगितले. केवळ वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेऊन उपयोग नाही, तर लावलेले रोप पुढील वर्षीही जिवंत राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘माझे झाड – माझी जबाबदारी’

विद्यार्थिनींनी प्रत्येकाने एक रोप दत्तक घेऊन त्याची नियमित काळजी घ्यावी, त्याच्या वाढीची नोंद ठेवावी आणि कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्या रोपाचे संगोपन करावे, असे आवाहन राठोड यांनी केले.

“तुम्ही आजच्या विद्यार्थीनी आहात; उद्या तुम्ही शिक्षिका, अधिकारी, डॉक्टर, अभियंते, समाजसेविका, उद्योजिका आणि जबाबदार नागरिक होणार आहात. तुमच्या छोट्याशा कृतीतून समाजात मोठा बदल घडू शकतो,” असेही त्यांनी सांगितले.

वाढते प्रदूषण, बदलते हवामान, कमी होत चाललेली हिरवाई आणि पाण्याचे संकट ही भविष्यासमोरील गंभीर आव्हाने आहेत. पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी केवळ शासन किंवा एखाद्या संस्थेची नसून प्रत्येक नागरिकाची आहे, असे राठोड यांनी स्पष्ट केले.

पुढील पिढीसाठी हिरवेगार पर्यावरण देण्याचा संकल्प

“आपण पुढच्या पिढीला केवळ पैसा, घर आणि संपत्ती देऊन चालणार नाही. त्यांना स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि हिरवेगार पर्यावरण देणे हीदेखील आपली जबाबदारी आहे. आज लावलेले छोटे रोप उद्या मोठा वृक्ष बनेल आणि त्याच्या सावलीत अनेकांना आधार मिळेल,” असे सुरेश राठोड यांनी सांगितले.

कार्यक्रमात विद्यार्थीनींनी “मी झाड लावेन, मी झाड जगवेन, पाणी वाचवेन, परिसर स्वच्छ ठेवेन आणि पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेईन,” असा पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.

‘एक रोप – एक संकल्प, हिरवे भविष्य – आपला संकल्प!’ या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन वाढदिवस, विवाह, वार्षिक कार्यक्रम तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या निमित्ताने फुलं किंवा इतर वस्तू देण्याऐवजी रोप भेट देण्याची चळवळ उभी करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

वृक्षसंवर्धनातून सामाजिक जबाबदारीची भावना वाढीस लागते. महानायक वसंतराव नाईक यांच्या हरित विकासाच्या विचारांना पुढे नेत हिरवा महाराष्ट्र घडविण्यासाठी विद्यार्थीनींसह प्रत्येक नागरिकाने वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनात सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

“झाडे लावा, झाडे जगवा; पाणी वाचवा, पर्यावरण वाचवा आणि देशाचे भविष्य घडवा,” असे आवाहन सुरेश राठोड यांनी शेवटी केले.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज