Top News

शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात क्रांतीदिन उत्साहात साजरा.



विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या वेशभूषेतून सादर केली देशभक्तीची विविध रूपे

जळगाव | प्रतिनिधी : शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी क्रांतीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध क्रांतिकारकांच्या वेशभूषा साकारत भाषणे, देशभक्तीपर गीते, नाटिका आणि नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. सचिन देशपांडे, ज्येष्ठ पर्यवेक्षक मा. श्री. संजय वानखेडे, पर्यवेक्षिका सौ. रमा तारे, ज्येष्ठ शिक्षिका सौ. पद्मजा जोशी, सौ. प्राजक्ता गोहिल आणि सौ. रोहिणी प्रचंड यांच्या उपस्थितीत विद्येची देवता सरस्वती माता तसेच थोर क्रांतिकारक भगतसिंग व राजगुरू यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सौ. रोहिणी प्रचंड यांनी क्रांतीदिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यानंतर विद्यार्थ्यांनी मंगल पांडे, राजगुरू, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, झाशीची राणी तसेच इंग्रज अधिकाऱ्यांच्या वेशभूषा साकारून स्वातंत्र्यलढ्याच्या विविध पैलूंचे प्रभावी सादरीकरण केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना मुख्याध्यापक मा. श्री. सचिन देशपांडे यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि क्रांतिकारकांच्या त्यागाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांनी क्रांतिकारकांना अभिवादन केले. तसेच विद्यार्थ्यांनी देशाभिमानाची भावना मनात बाळगून देशाच्या विकासात भरीव योगदान द्यावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इतिहास विभागातील सौ. रोहिणी प्रचंड, सौ. रेवती किन्हीकर, सौ. संगीता कुळकर्णी, सौ. मनिषा पवार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रज्ज्वल साळुंखे व प्रथमेश माळी यांनी केले, तर कृष्णा तांबट याने आभार प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीच्या वातावरणात उत्साहात पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज