धरणगाव प्रतिनिधी : गाडी क्रमांक 09049/09050 दादर–भुसावल एक्सप्रेस ही सध्या 31 जुलै 2026 पर्यंत दर शुक्रवारी धावत असून, ही सेवा कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात खानदेशच्या खासदार मा. स्मिताताई वाघ, डीआरएम, पश्चिम रेल्वे, डेप्युटी जनरल मॅनेजर तसेच जनरल मॅनेजर, पश्चिम रेल्वे, चर्चगेट, मुंबई यांना पश्चिम रेल्वेच्या ZRUCC सदस्य प्रतिक जैन तसेच खानदेश प्रवासी असोसिएशन, धरणगाव यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दादर–भुसावल एक्सप्रेसला खानदेशातील प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असून जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील हजारो प्रवाशांसाठी मुंबईकडे प्रवास करण्यासाठी ही रेल्वे सेवा अत्यंत उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे ही गाडी दर शुक्रवारी कायमस्वरूपी सुरू राहिल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होईल. तसेच भारतीय रेल्वेच्या प्रवासी संख्येत आणि महसुलातही वाढ होण्यास मदत होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, 19003/19004 भुसावल–दादर खानदेश एक्सप्रेस ही आठवड्यातून सहा दिवस सुरू केल्याबद्दल रेल्वे प्रशासन तसेच खासदार मा. स्मिताताई वाघ यांचे खानदेश प्रवासी असोसिएशन, ZRUCC सदस्य प्रतिक जैन (पश्चिम रेल्वे, मुंबई) आणि खानदेशातील प्रवाशांच्या वतीने मनःपूर्वक आभारही व्यक्त करण्यात आले.
Post a Comment