पाळधी : शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बस पकडताना गर्दीत पाय घसरून बसखाली आल्याने १५ वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. राजनंदिनी श्रीराम शिंदे असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती पाळधी येथील झंवर विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती.
सोमवारी (५ ऑक्टोबर) दुपारी शाळा सुटल्यानंतर पाळधी बसस्थानकावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती. बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीत राजनंदिनीचा पाय घसरला आणि ती चालत्या बसच्या चाकाखाली आली. या भीषण अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. तेथे नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
पाळधी बसस्थानकावर शाळा सुटण्याच्या वेळेत विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असताना अपुऱ्या बसेसमुळे जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या वेळेत स्वतंत्र व अतिरिक्त एसटी बसेस सोडाव्यात, अशी मागणी संतप्त पालक व ग्रामस्थांनी केली आहे.

Post a Comment