Top News

तळोद्यात गणेश विसर्जन मिरवणुकीतील देखाव्यावर आक्षेप; चौकशी करून कारवाईची हिंदू जनजागृती समितीची मागणी

 

 तहसीलदारांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ 
तळोदा, जि. नंदुरबार : श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान नेमसुंडील शाळेच्या माध्यमातून ध्वजाची प्रतिकृती तयार करून ती हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून मिरवणुकीत नाचविण्यात आल्याचा आरोप करत हिंदू जनजागृती समितीने या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याबाबत समितीने तळोदा तहसीलदारांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान नेमसुंडील शाळेच्या माध्यमातून ध्वजाची प्रतिकृती तयार करून, हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून ती मिरवणुकीत नाचविण्यात आली. तसेच या माध्यमातून वादग्रस्त देखावा सादर करण्यात आल्याचा दावा समितीने केला आहे.

गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि धार्मिक परंपरेचा उत्सव असल्याचे नमूद करत, अशा मंगलमय प्रसंगी धार्मिक भावना दुखावतील किंवा सामाजिक तेढ निर्माण होईल, असे प्रकार टाळणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकारामुळे भाविकांमध्ये संताप व निषेधाची भावना निर्माण झाल्याचा दावा समितीने केला आहे.

 पोलीस प्रशासनाला निवेदन देताना धर्मप्रेमी 
शाळेतील लहान विद्यार्थ्यांना हिरवे कपडे घालून ध्वजाच्या प्रतिकृतीजवळ नाचविण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. तसेच श्री शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक घटनेशी किंवा प्रसंगाशी विपरीत अर्थ निर्माण करणारा हा देखावा होता का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावणे, समाजात कलुषित वातावरण निर्माण होणे किंवा सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे समितीने निवेदनात नमूद केले आहे.

पुरावे तपासून कारवाईची मागणी

या प्रकरणातील उपलब्ध व्हिडिओ चित्रीकरण, छायाचित्रे व इतर पुरावे तपासून निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित शाळा व्यवस्थापन व आयोजकांना धार्मिक भावना दुखावणारे प्रकार भविष्यात घडू नयेत, याबाबत कडक शब्दांत समज द्यावी, अशी मागणी आहे.

तळोदा शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. निवेदनावर समितीचे श्री. विनोद शिंदे यांची स्वाक्षरी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज