राज्य प्रतिनिधी :- श्री सुरज पवार
माहूर : श्री दत्तात्रेय शिखर संस्थान, माहूरगड येथील निवासस्थानाबाबत वाद निर्माण झाला असून, माहूर महंत गादीच्या वारस घराण्यातील संन्यासी श्री चिंतामण भारती गुरु धनराज भारती यांच्या गैरहजेरीत त्यांच्या निवासस्थानाला लॉक लावून कथितरीत्या बेकायदेशीर ताबा घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात देवस्थान विश्वस्त मंडळातील शासकीय विश्वस्तांकडून या संदर्भातील जबाबदारी स्वीकारली जात नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे माहूर तहसीलदारांनी या प्रकरणातील आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी संबंधितांकडून करण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती श्री दत्तशिखर संस्थानचे भाविक, भक्त आणि संत समाजाला व्हावी, तसेच देवस्थानाच्या हिताच्या दृष्टीने पुढील नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी रविवार, १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेनंतर संत समाज व भक्त मंडळींसोबत देवस्थानाच्या हिताच्या दृष्टीने पुढील कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर यासंदर्भातील पुढील भूमिका व माहिती प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.
दरम्यान, निवासस्थानाला लॉक लावणे, ताबा घेणे तसेच विश्वस्त मंडळ व तहसीलदारांची भूमिका याबाबत संबंधित प्रशासन व विश्वस्त मंडळाची अधिकृत बाजू समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Post a Comment