धरणगाव : धरणगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी रूपालीताई पवन महाजन देवरे यांची दिनांक ११ सप्टेंबर रोजी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीमुळे महाजन कुटुंबाच्या सामाजिक व राजकीय वाटचालीत आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे.
रूपाली महाजन या शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष, श्री व्यायाम प्रसारक मंडळाचे संचालक तसेच माळी समाजाचे पदाधिकारी देविदास बापू महाजन यांच्या सुनबाई असून, उद्योगपती पवन भाऊ महाजन यांच्या धर्मपत्नी आहेत.
निवड प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी गायकवाड साहेब, मुख्याधिकारी रोशन कुमार राजपूत तसेच कार्यालयीन अधिकारी भिकन पारधी उपस्थित होते. निवड बिनविरोध झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त उपनगराध्यक्ष रूपाली महाजन यांचे स्वागत व सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील, जळगाव जिल्हा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील, राष्ट्रीय चर्मकार समाजाचे नेते भानुदास विसावे, शिवसेनेचे युवा नेते प्रतापराव पाटील, मोठा माळीवाडा समाजाचे संचालक विजय भाऊ महाजन, माजी गटनेते पप्पू भाऊ भावे, नगरपालिकेचे गटनेते विलास भाऊ महाजन, धरणगाव शहर शिवसेना शहरप्रमुख धीरेन आप्पा पूर्भे यांच्यासह शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, महायुतीचे पदाधिकारी तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रूपाली महाजन यांच्या बिनविरोध निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. आगामी काळात शहराच्या विकासासाठी प्रभावीपणे काम करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Post a Comment