![]() |
| स्टेअरिंग लॉक झाल्याचा प्राथमिक अंदाज; अपघाताच्या चौकशीची नागरिकांची मागणी |
गडचिरोली प्रतिनिधी संजय बागडे : गडचिरोलीहून चामोर्शीकडे जाणारी MH 06–8848 क्रमांकाची एसटी बस गुरुवारी (१८ सप्टेंबर) दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास शिवणीजवळ अचानक पलटी झाल्याची घटना घडली. या बसमध्ये सुमारे ६८ प्रवासी प्रवास करत होते. अपघातात ३१ प्रवासी जखमी झाल्याचे समजते.
जखमींपैकी २९ प्रवाशांना उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धावत्या बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.
बस पलटी होताच शिवणी गावातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना मदत केली.
या अपघाताची सखोल चौकशी करून नेमके कारण स्पष्ट करावे तसेच निष्काळजीपणा किंवा तांत्रिक बिघाडास जबाबदार असणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment