ग्रामीण भागातील बैलपोळा आता हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आहे. खेड्यापाड्यांत बैलजोड्यांची संख्या कमी झाली आहे. बदलत्या काळात वाचकांचे प्रमाणही कमी होत असल्याने अनेक लेखकांनी लेखन थांबवले. मात्र पोळ्याच्या निमित्ताने हा लेख आपल्या हक्काच्या वाचकांसाठी...
— प्रा. डॉ. रवी दलाल
बैलपोळा म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी माणसाच्या जिव्हाळ्याचा आणि कृतज्ञतेचा उत्सव. शेतकऱ्याच्या जीवनात बैलाचे स्थान केवळ पशू म्हणून नव्हे, तर कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे होते.
पोळ्याच्या आदल्या दिवसापासूनच बैलांचे शेतीचे काम बंद केले जायचे. फक्त हिरवा चारा खाऊ घालण्यासाठी त्यांना शिवारात नेले जायचे. पोळ्याच्या दोन-तीन दिवस आधीपासूनच बैलांना ढेप, सरकीचा कडबा, कुटार, गव्हाचा उंडा असे पौष्टिक खाद्य दिले जायचे. दिवसभर त्यांना आराम दिला जायचा.
पोळ्याच्या दिवशी बैलजोडीला नदीवर किंवा विहिरीवर नेऊन पाण्यात पोहू घातले जायचे. रात्री हळद आणि तूप गरम करून बैलांच्या खांद्याला मर्दन केले जायचे. खांदे शेकून झाल्यानंतर घरातील सुवासिनी बैलांची पूजा करायची. पळसाच्या फांद्या अर्थात बेगड दरवाजात उभ्या करून बैलांची औक्षणे केली जायची.
यानंतर घरचा धनी दोन्ही हातांचा पोगा करून मोठ्याने बैलांना जेवणाचे आमंत्रण द्यायचा—
“आज आवतन आहे, उद्या जेवायला येजा हो नंदीबैल हो...”
हा आवाज रात्री गावातील घराघरांतून आणि गावाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचायचा. घरातील बाई आणि घरधनी बैल जेवेपर्यंत उपवास करायचे. बैलाने मान हलवून होकार दिल्याशिवाय त्याच्या कानाजवळ पुन्हा पुन्हा आवाज दिला जायचा. त्यानंतर पुरणपोळीचा गोड घास बैलाला भरवून पूजा पूर्ण केली जायची. बैलाला दंडवत घालून वर्षभराच्या श्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जायची.
बैलांची रंगरंगोटी म्हणजे जणू नवरदेवाचा साज!
पूजा झाल्यानंतर बैलांची सजावट सुरू व्हायची. रंगरंगोटी पहाटेपर्यंत चालायची. टोकदार शिंगांवर रंगीत बेगड लावले की बैलजोडीचे रूपच पालटून जायचे.
जुने वैसण, टाटे, मंढाटे आणि घुंगरू काढून नवा दोर, नवी वैसण, नवा गळपट्टा, नवे घुंगरू आणि नवा मुसका बांधला जायचा. बैलाच्या पाठीवर लाल गेरूने हाताचे पंजे उमटवले जायचे. कधी ग्लास-वाटी गेरूमध्ये भिजवून पाठीवर ठसे उमटवले जात. शिंगांवर रंगीबेरंगी बेगड, त्यावर आरसे, रंगीत तुरे, मोरपिसांचे झुबके आणि गळ्यात कवळ्यांची माळ असा साज चढवला जायचा.
पाठीवर नवी रंगीबेरंगी झूल घातली की बैलजोडी अगदी नवरदेवासारखी सजून तोरणी जाण्यास तयार व्हायची.
वर्षभर बैलांची जीवापाड सेवा करणाऱ्या गडी-माणसालाही घरमालकाकडून नवीन पांढरे कपडे दिले जायचे. त्यानंतर वाजत-गाजत बैल गावाच्या वेशीवर तोरणाखाली आणले जायचे.
तोरणाखाली बैलजोड्यांची लगबग
गावातील सर्व बैलजोड्या तोरणाखाली रांगेत उभ्या केल्या जायच्या. पाटलांची मानाची बैलजोडी येईपर्यंत पोळा फुटत नसे. पाटलांची बैलजोडी वाजत-गाजत आली की गोठाणाची पूजा व्हायची आणि त्यानंतर पोळा फुटायचा.
या उत्सवात ग्रामीण जीवनातील अनेक पारंपरिक प्रथा, गमती-जमती आणि लोकसंस्कृतीचे दर्शन घडायचे. काही ठिकाणी दारूच्या नशेत झडत्या, शिवीगाळ, भांडणे आणि मारामाऱ्या देखील व्हायच्या. मात्र ही भांडणे बहुतांश वेळा त्या दिवसापुरतीच मर्यादित राहायची. दुसऱ्या दिवशी पुन्हा गावचे व्यवहार पूर्वपदावर यायचे.
आजच्या काळात या जुन्या प्रथा कमी झाल्या आहेत; मात्र बैलांविषयीची आदराची भावना अजूनही अनेकांच्या मनात कायम आहे.
आता बैलाची जागा ट्रॅक्टरने घेतली
काळ बदलला. शेतीच्या कामात यंत्रांचा वापर वाढला आणि बैलाची जागा हळूहळू ट्रॅक्टरने घेतली. आज शेतात नांगरणीपासून पेरणीपर्यंत अनेक कामे यंत्रांच्या सहाय्याने केली जातात.
पण अजून तरी “ट्रॅक्टरपोळा” भरत नाही, हे नव्या पिढीचे एक वेगळेच भाग्य म्हणावे लागेल!
बैलपोळा आज प्रामुख्याने ग्रामीण भागातच पाहायला मिळतो. बैलजोड्या कमी झाल्या असल्या तरी बैलाविषयीची कृतज्ञता आणि आपुलकी अजूनही टिकून आहे. मात्र पुढील पिढीत बैलाला घरातील सदस्य मानण्याची परंपरा कायम राहील का, हा प्रश्न आहे.
चाकापासून कृषिसंस्कृतीपर्यंत...
मानवी जीवनाच्या उत्क्रांतीकडे मागे वळून पाहिले तर अग्नीचा शोध जितका महत्त्वाचा होता, त्याहून कमी महत्त्वाचा चाकाचा शोध नव्हता. आदिम काळातील मानव टोळ्या करून जंगलात भटकत होता. चाकाचा शोध लागला आणि मानवी जीवनाला नवी दिशा मिळाली.
पुढे बैलांच्या सहाय्याने शेती करण्याचे तंत्र मानवाला अवगत झाले आणि कृषिसंपन्न संस्कृतीचा झपाट्याने विकास झाला. आज आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने शेतीचे तंत्र विकसित झाले असले तरी शतकानुशतके भारतीय शेती बैलांच्या ताकदीवरच अवलंबून होती.
म्हणूनच बैलाला आपल्या कृषिसंस्कृतीत एक आगळेवेगळे आणि उपकारी स्थान आहे.
कृतज्ञतेचा सण म्हणजे बैलपोळा
श्रावणी अमावस्येला साजरा होणारा बैलपोळा हा भारतीय परंपरेतील महत्त्वाचा सण आहे. अन्नधान्य पिकविण्यासाठी वर्षभर शेतकऱ्यासोबत राबणाऱ्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण महाराष्ट्राची खास ओळख आहे.
आदल्या दिवशी बैलांना आवतन, त्यानंतर पाणवठ्यावर अंघोळ, खांद्याला तूप-हळदीने मर्दन, पाठीवर लालसर गेरूचे नक्षीकाम, शिंगांना बेगड, गळ्यात घुंगरमाळा किंवा पितळी घंटा आणि त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य—किती विविधतेने आणि प्रेमाने हा सण साजरा केला जात असे!
संध्याकाळी गावातील सर्व बैलजोड्या तोरणाखाली एकत्र आणल्या जायच्या. वाजंत्री, ढोल-ताशे, सनई, चौघडा आणि फटाक्यांच्या गजरात बैलांची मिरवणूक गावभर फिरायची. गावातील मानकरी आणि पुढाऱ्यांची बैलजोडी पुढे काढल्यानंतर पोळा फुटायचा.
‘बोजारा’ची जुनी परंपरा
पोळ्याच्या दिवशी बैलजोडी घेऊन घरोघरी जाण्याची आणि ‘बोजारा’ मागण्याची प्राचीन पद्धतही होती.
बैलांचे वर्षभर संगोपन करणारा, त्यांना चारा-पाणी देणारा आणि त्यांची काळजी घेणारा गडी म्हणजे बैलाचा ‘बोजा’ उचलणारा. पोळ्याच्या दिवशी त्याला पैसे देण्याची प्रथा म्हणजेच ‘बोजारा’.
घरातील बाई दारात येऊन बैलांचे पाय धुवायची, कुंकवाचा टिळा लावून पूजा करायची, आरती ओवाळायची आणि पुरणपोळीचा गोड घास भरवायची. त्यानंतर गड्याला बोजारा म्हणून पैसे दिले जायचे.
घरचे वैभव बैलामुळे आहे, अशी भावना शेतकरी कुटुंबांच्या मनात होती.
बैल नसलेल्या घरातही पोळा!
ज्यांच्या घरी बैल नसत, त्या घरात मातीचे बैल करून त्यांची पूजा करण्याची प्रथा अनेक ठिकाणी आजही आहे.
पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी लहान मुलांचा तान्हापोळा किंवा बाळपोळा भरतो. लाकडी किंवा मातीचे बैल सजवून लहान मुले या उत्सवात सहभागी होतात. काही ठिकाणी सजावटीच्या स्पर्धाही घेतल्या जातात आणि उत्कृष्ट सजावटीसाठी बक्षिसे दिली जातात.
यातून पुढच्या पिढीपर्यंत सांस्कृतिक वारसा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो.
पर्यावरणपूरक शेतीची आठवण
काही वर्षांपूर्वी शेतीची अनेक कामे बैलांच्या मदतीने केली जायची. शेताला पाणी देण्यासाठीही बैलांचा वापर होत असे. चामड्यापासून तयार केलेल्या पखालीच्या माध्यमातून विहिरीतून बैलांच्या ताकदीने पाणी खेचले जायचे.
ही पद्धत पर्यावरणपूरक होती. भूजलाचा वापरही मर्यादित प्रमाणात होत असे. मात्र काळ बदलला आणि विंधन विहिरी, विद्युत मोटारी आणि शेतीपंपांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भूजलाचा उपसा सुरू झाला. परिणामी भूजलसाठ्यावर ताण वाढत गेला.
आज आधुनिक यंत्रशक्तीची गरज आहेच; परंतु पर्यावरणपूरक शेतीच्या पारंपरिक पद्धतींचाही विचार करण्याची गरज आहे.
बैलपोळा म्हणजे श्रमाचा सन्मान
बैल हा केवळ शेतकऱ्याचा पशू नव्हता; तो शेतकऱ्याचा सखा, सहकारी आणि कुटुंबाचा सदस्य होता. वर्षभर शेतात राबणाऱ्या या मुक्या जीवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा साजरा केला जातो.
आज बैलांची संख्या कमी झाली, शेतीचे स्वरूप बदलले आणि ट्रॅक्टरने बैलाची जागा घेतली. तरीही बैलपोळ्याचे महत्त्व कमी होत नाही.
कारण बैलपोळा हा केवळ एका प्राण्याची पूजा करणारा सण नाही; तो श्रमाचा सन्मान, शेतकऱ्याची कृतज्ञता, निसर्गाशी असलेला ऋणानुबंध आणि आपल्या कृषिसंस्कृतीच्या आठवणी जपणारा उत्सव आहे.
बदलत्या काळात आधुनिक शेती स्वीकारताना आपल्या या समृद्ध ग्रामीण परंपराही जपल्या गेल्या पाहिजेत. कारण परंपरा संपली की केवळ एक सण संपत नाही—तर त्या सणामागची जीवनपद्धती, संस्कृती आणि पिढ्यान्पिढ्यांच्या आठवणीही हळूहळू हरवतात.
बैलपोळा जपूया...
श्रमाचा सन्मान करूया...
आणि आपल्या कृषिसंस्कृतीचा हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया!
✍️ प्रा. डॉ. रवी दलाल, काटोल, नागपूर
संकलन : अविनाश गोंडाणे, अमरावती
मो. ९९२३२६४१९३
Post a Comment