नवी दिल्ली येथे सुरज सुधाकरराव पवार यांचे निवेदन; हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कार्याचा गौरव करण्याची मागणी
नवी दिल्ली, दि. १० ऑगस्ट २०२६ :
हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करावा, या मागणीसाठी आज नवी दिल्ली येथे निवेदन देण्यात आले.
पत्रकार, महाराष्ट्र राज्य सनातन सारथी न्यूजचे प्रतिनिधी तसेच ‘वसंत गीतांजली’ काव्यसंग्रहाचे संपादक, लेखक, कवी, समाजसेवक व अभिनेता सुरज सुधाकरराव पवार यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपला ‘वसंत गीतांजली’ काव्यसंग्रह केंद्रीय मंत्री आठवले यांना सस्नेह भेट दिला.
यावेळी स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या कृषी, ग्रामीण विकास आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव व्हावा, तसेच त्यांच्या योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदनही सुरज पवार यांनी सादर केले.
वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी आणि त्यांच्या कार्याचा राष्ट्रीय सन्मान व्हावा, या उद्देशाने भारतरत्न पुरस्काराची मागणी करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.
या भेटीदरम्यान ‘वसंत गीतांजली’ या काव्यसंग्रहामागील संकल्पना आणि स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या कार्याला काव्यरूपातून अभिवादन करण्याचा प्रयत्न याबाबतही चर्चा झाली.
वसंतराव नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी राष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी पुढील काळातही प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे सुरज सुधाकरराव पवार यांनी सांगितले.
Post a Comment