![]() |
| शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयातर्फे ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग |
जळगाव प्रतिनिधी :
जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात ७९व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान, देशप्रेम, राष्ट्रभक्ती, सांस्कृतिक जाणीव आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यासाठी ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ या उपक्रमांतर्गत ३०० फूट लांब भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.
शाळेच्या प्रांगणातून देशभक्तीपर गीतांच्या निनादात रॅलीला सुरुवात झाली. शेकडो विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीत सहभाग घेतला. एन.सी.सी. पथकातील कॅडेट्स तसेच विद्यार्थ्यांनी सन्मानाने ३०० फूट लांबीचा भव्य तिरंगा हातात घेऊन रॅलीत सहभाग नोंदविला. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरलेला ३०० फूट लांबीचा तिरंगा पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली. शिस्तबद्ध पद्धतीने तिरंगा घेऊन मार्गक्रमण करणारे एन.सी.सी. कॅडेट्स आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना देणारे विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक संजय वानखेडे, ज्येष्ठ पर्यवेक्षिका रमा तारे, पर्यवेक्षक जगदीश साळुंखे, एन.सी.सी. विभाग प्रमुख श्रीकांत घुगे आणि क्रीडा विभाग प्रमुख उल्हास ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वातंत्र्यलढा, स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग व बलिदान, राष्ट्रप्रेम आणि शिस्तीचे महत्त्व याबाबत माहिती दिली.
एन.सी.सी. विभाग प्रमुख श्रीकांत घुगे, क्रीडा विभाग प्रमुख उल्हास ठाकरे, पंकज खंडाळे आणि हेमंत सपकाळे यांनी रॅलीचे उत्कृष्ट नियोजन केले.
या देशभक्तीपर उपक्रमास शिक्षक आनंदा चौधरी, आनंद पाटील, सोमनाथ महाजन, प्राजक्त प्रचंड, प्राजक्ता गोहिल, रेवती किन्हीकर, मनिषा वानखेडे, संगीता कुलकर्णी, स्मिता करे, सुनीता रोटे, योगेश सोनजे, पंकज महाले, प्रेम सारस्वत, सुनील अंबिकर, सरजू निंभोरकर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सर्वांच्या सहकार्यामुळे ३०० फूट लांबीची भव्य तिरंगा रॅली उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि देशभक्तीमय वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.




Post a Comment